Advertisement

विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट केली हॅक

प्रजापत्र | Saturday, 22/01/2022
बातमी शेअर करा

एथिकल हॅकर असलेल्या श्रेयस गुजर या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी आणि असुरक्षितता दाखवून दिल्या आहेत. विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून लाखो विद्यार्थी, प्राध्यापक, परीक्षा या संदर्भातील संवेदनशील विदा असुरक्षित असल्याची विद्यापीठाला माहिती करून दिली असून, आता संपूर्ण प्रणालीतील त्रुटी दूर करून प्रणाली सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठाकडून तातडीने पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

 

श्रेयस गुजर फर्ग्युसन महाविद्यालयात संगणकशास्त्र शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तो प्रमाणित एथिकल हॅकरही आहे. त्याने यापूर्वी विविध कंपन्या आणि केंद्र सरकारसाठीही काम केले आहे. विद्यापीठाच्या प्रणालीत त्रुटी असल्याचे त्याला जून २०२१मध्ये लक्षात आले होते. त्यानुसार त्याने कुलगुरूंचे प्रणालीतील खाते हॅक करून ई-मेलद्वारे ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनासही आणून दिली. मात्र विद्यापीठाकडून त्याबाबत काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद देण्यात न आल्याने श्रेयसने डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाकडून या प्रकाराची दखल घेऊन प्रणालीतील त्रुटी दुरुस्त करण्यात आली.

 

प्रणालीतील त्रुटींविषयी श्रेयस म्हणाला, की विद्यापीठाने आपली प्रणाली, संकेतस्थळ अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडे संपूर्ण माहिती तंत्रज्ञान विभाग असूनही अशा किरकोळ त्रुटी प्रणालीत राहत असतील तर लाखो विद्यार्थी, प्राध्यापकांची माहिती, संवेदनशील विदा याला धोका निर्माण होऊ शकतो,याचा विचार विद्यापीठाने केला पाहिजे.

 

याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणतात, “विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी दाखवून दिली ही खरी गोष्ट आहे. त्याबाबत विद्यापीठाच्या आयटी विभागाने विद्यार्थ्याचे कौतुक करून त्याला प्रशस्तीपत्रही देऊन प्रणालीत दुरुस्तीही केली. मात्र, या विद्यार्थ्याने दाखवून दिलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने संपूर्ण प्रणालीच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात येईल. बदलत्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल”.

 

Advertisement

Advertisement