बीड - डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने बीडमध्ये अनाधिकृत बायोडिझेलची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बीड येथील दोन अवैध बायोडिझेलच्या पंपावर प्रशासनाने धाडी टाकून ते सील केलेआहेत. मात्र आता बायोडिझेल माफिया कॅनमधून बायोडिझेलचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले. रात्री एसपींच्या पथकाने बायोडिझेलचा एक पिकअप ताब्यात घेतला. त्यामध्ये दोन हजार लिटर बायोडिझेल मिळून आले.
डिझेलच्या किमतीचा भडका उडाल्याने डिझेलला पर्याय म्हणून अनेक जण सर्रासपणे बायोडिझेलचा अनाधिकृत वापर करत आहेत. बीडमध्ये तर चक्क दोन बायोडिझेलचे पंपच सुरू करण्यात आले होते. ते दोन्ही पंप प्रशासनाने सील केले. त्यानंतरही बायोडिझेल माफिया कॅनमधून बायोडिझेल आणून ते वाहन चालकांना विकतात. रात्री पेट्रोलिंग करत असताना एसपींचे पथकप्रमुख एपीआय गणेश ढोकरत यांना मिळाल्यानंतर त्यांनी बायोडिझेलचा पिकअप (क्र. एम.एच. ४६ एआर ७२५१) ताब्यात घेतला. त्यामध्ये दोन हजार लिटर बायोडिझेल मिळून आले. ही कारवाई तेलगाव रोड येथे करण्यात आली. या वेळी त्यांनी पठाण निसार शहेजादा (रा. बालेपीर) याला ताब्यात घेत ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील कारवाई एपीआय गणेश ढोकरत, अन्वर शेख यांच्यासह आदींनी केली.