IPL 2022 च्या मेगा लिलावात 1,214 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. या खेळाडूंमध्ये 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू असतील. दोन दिवस चालणाऱ्या या मेगा लिलावात 10 संघ सहभागी होणार आहेत. 270 कॅप्ड खेळाडू, 903 अनकॅप्ड खेळाडू आणि 41 सहयोगी देशांचे खेळाडूही लिलावात सहभागी होणार आहेत.
17 भारतीय खेळाडू आणि 32 विदेशी खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी आहे
मेगा लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या 2 कोटींच्या बेस प्राईजच्या यादीत 49 खेळाडू आहेत. या यादीत 17 भारतीय तर 32 परदेशी खेळाडू आहेत. भारताकडून रविचंद्रन अश्विनशिवाय श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना यांची नावे आहेत.
त्याचबरोबर वॉर्नर, रबाडा, ब्राव्हो व्यतिरिक्त पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वूड, ट्रेंट बोल्ट आणि फाफ डू प्लेसिस अशी मोठी नावे परदेशी खेळाडूंमध्ये आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरू येथे होणाऱ्या मेगा लिलावामध्ये फ्रँचायझींनी निवडलेली नावे बोलीसाठी मांडली जातील.
33 खेळाडूंना करण्यात आले रिटेन
आयपीएल 2022 साठी 33 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. 8 संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्याच वेळी, 2 नवीन आयपीएल संघांनी त्यांच्या संघात 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. केएल राहुलला लखनऊने 17 कोटींमध्ये त्याच्या टीमसोबत जोडले आहे.यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. यापूर्वी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला 2018 ते 2021 या हंगामात केवळ 17 कोटी रुपये मिळत होते. लखनऊने केएलला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे.
या खेळाडूंनी माघार घेतली
वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ख्रिस गेलने लिलावात आपले नाव दिलेले नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, इंग्लंडचा सॅम कुरन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जो रूट, ख्रिस वोक्स यांनीही आपली नावे लिलावात समाविष्ट केलेली नाहीत.