बीड : जिल्ह्यातील ५ नगरपंचातींच्या झालेल्या निवडणुकीत आष्टी मतदारसंघावर आ. सुरेश धस यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले असून या मतदारसंघातील तीनही पंचायती त्यांनी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. तर केजमध्ये खूप वर्षानंतर परिवर्तन झाले असून काँग्रेसला नाकारीत येथील जनतेने जनविकासचे हारून इनामदार यांच्याकडे सत्ता दिली आहे. येथे राष्ट्रवादीला ५ तर काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. वडवणीत भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश मिळाले असून याठिकाणी भाजपच्या ८ तर राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीच्या मिळून ९ जागा आल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील पाच नर पंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. यात अपेक्षेप्रमाणे आष्टी मतदारसंघावर आ. सुरेश धस यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. आष्टी नगरपंचातीमध्ये भाजपने ११जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी २ , काँग्रेस १ आणि अपक्ष ४ असे उमेदवार विजयी झाले आहेत.
शिरूर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने सारी शक्ती झोकून दिली होती, मात्र येथेही राष्ट्रवादीला यश मिळाले नाही. राष्ट्रवादीच्या वाट्याला येथील ४ जागा आल्या असून येथे सेनेने २ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने ११ जागा जिंकत हि नगरपंचायत ताब्यात घेतली आहे. पाटोद्याथी भाजपचेच वर्चस्व आहे.
केज नगरपालिकेतील निकालांनी मात्र जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. याठिकाणी खा. रजनी पाटील गटाला मोठी धोबीपछाड मिळाली आहे. हारून इनामदार यांच्या नेतृत्वातील जनविकास आघाडीने याठिकाणी जोरदार मुसंडी मारीत ८ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला ५ जागा आल्या आहेत. १ ठिकाणी अपक्ष विजयी झाला असून पूर्वीच्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
वडवणी नगर पंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली होती. याठिकाणी भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी सारी राष्ट्रवादी एकवटली होती. येथे राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीने निसटते बहुमत मिळविले आहे. भाजपला ८ तर राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीला मिळून ९ जागा मिळाल्या आहेत. यात राष्ट्रवादीच्या ६ आणि आघाडीच्या ३ जागा आहेत. यामुळे राजाभाऊ मुंडेंच्या सत्तेला मात्र धक्का बसला आहे.
प्रजापत्र | Wednesday, 19/01/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा