बीड : बीड जिल्ह्यात यापूर्वी वाळू तस्करीसाठीच्या रेटकार्डने खळबळ माजविली होती. त्यापाठोपाठ आता चक्क एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतच 'वसुली' होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एसीबीचे रेटकार्डच सामाजिक कार्यकर्ते बक्षु अमीर शेख यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविल्यानंतर या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या तक्रारीत एसीबीच्या मार्फत महिन्याला २४ लाखाची वसुली होत असल्याचा दावा करण्यात आला असून एसीबीच्या यापूर्वीच्या उपाधिक्षकासह विद्यमान पोलीस निरीक्षकांवर हे आरोप करण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात लाचखोरी आणि टक्केवारीची चर्चा नेहमीच होत असते. यापूर्वी जिल्ह्यात वाळू तस्करीसाठी कोणाला किती लाच द्यावी लागते याचे एक रेटकार्डच वाळू वाहतूकदारानी जाहीर केले होते, त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती . आता यापुढचे टोक समोर येत आहे. मागच्या काही वर्षात बीड जिल्ह्यात एसीबीनेच कारवाई न करण्यासाठी 'वसुली ' केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते बक्षु अमीर शेख यांना टपालाने यासंदर्भात एक माहिती मिळाली , त्यानुसार जिल्ह्यात एसीबीकडून महिन्याला २४ लाखाची वसुली करण्यात येत असून यात तत्कालीन उपाधीक्षक बाळकृष्ण हनपुडे आणि सध्या पोलीस निरीक्षक म्हणून एसीबीतच कार्यरत असलेले रवींद्र परदेशी यांच्यावर या वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत.
तत्कालीन उपाधिक्षकांविरुद्ध आरोप
सदर तक्रार यापूर्वीच गृह मंत्र्यांना करण्यात आली होती. यात तत्कालीन उपाधीक्षक आणि सध्या एसीबी बीडमध्ये निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मालमत्तांचा देखील उल्लेख तक्रारीत करण्यात आला असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरटीओवर नाही एकही कारवाई
बीड जिल्ह्यात १९८० पासून बीडच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एकदाही एसीबीच्या छापा किंवा सापळा झालेला नाही असा दावा देखील करण्यात आला आहे. यातूनच एसीबीचे या कार्यालाउयाशी लागेबांधे असल्याचे समोर येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मागणी समोर येऊनही कारवाई नाही
दरम्यान आरटीओ कार्यालयात लाच मागितली जात असल्याची तक्रार सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार लाचेची मागणी नोंदविण्यात देखील आली. रेकॉर्डरमध्ये ती नोंद झाली, मात्र नंतर त्या व्यक्तीला याचा संशय आल्याने त्याने लाच घेतली नाही. मात्र त्या अधिकाऱ्यांविरुद्ध लाचेही मागणी केल्याचा गुन्हा अद्याप देखील दाखल झाला नाही असेही तक्रारीत म्हटले आहे.
शेवटपर्यंत पाठपुरावा करणार
मी अनेक दिवसांपासून एसीबी कार्यालयातील 'वसुलीचा ' पाठपुरावा करी आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणात आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करू. ज्या कार्यालयाने लाच रोखायची तेच कार्यालय बरबटले तर कसे होणार ?बक्षु अमीर शेख (सामाजिक कार्यकर्ते )