Advertisement

रुग्णाच्या मृत्युनंतर नातेवाईकांचा दवाखान्यात धिंगाणा;जिल्हाधिकार्‍यांची भेट

प्रजापत्र | Wednesday, 07/10/2020
बातमी शेअर करा

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धिंगाणा केला. वार्डात जावून नातेवाईकांनी सक्शन मशिनची तोडफोड करत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रुग्णालयाला भेट दिली असून तेथील सुरक्षा व्यवस्था अधिक आवळण्याचे निर्देश दिले आहेत.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्त आणि अतिगंभीर आजारांवरील रुग्णांवर उपचार होत आहेत. मात्र या ठिकाणी कोरोना वार्डातही रुग्णांच्या नातेवाईकांची सर्रास राबता असतो. विशेष म्हणजे त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक देखील नातेवाईकांना अडविण्याचा प्रयत्नही करत नाहीत.
अशातच बुधवारी सायंकाळी किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या आणि न्युमोनिया झालेल्या संतराम थोरात या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सदर रुग्णाच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह होत्या. त्याच्यावर बिगर कोरोना वार्डात उपचार सुरु होते. रुग्ण लघवीला गेल्यानंतर परत येताना खाली पडला. कर्तव्यावर असलेले भूलतज्ञ डॉ.काशीकर यांनी रुग्णाला तातडीने व्हेंटीलिटरवर घेतले मात्र उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यु झाला.
या घटनेनंतर रुग्णाचे नातेवाईक असलेले लव थोरात, कुश थोरात आणि अन्य एकाने वार्डात गोंधळ घालत सक्शन मशिनची तोडफोड केली तसेच कॉटही फेकून दिले. कर्तव्यावरील डॉक्टरांना धक्काबुक्की करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देखील घटनेची माहिती दिली. यानंतर स्वत: जिल्हाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. विशेष म्हणजे हा गोंधळ होत असताना कोरोना वार्डासाठी नियुक्त पोलीस कर्मचारी गायब होते. जिल्हा शल्यचिकित्सक आल्यानंतर पोलीसांचा फौजफाटा दवाखान्यात आला.
दरम्यान यातील आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे तर जिल्हा  रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था तातडीने अधिक आवळण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. त्या वार्डाच्या बाहेर बॅरीकेट टाका आणि त्या परिसरात डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचार्‍यांशिवाय कोणीही गेले नाही पाहिजे याची दक्षता घेण्याचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

 

Advertisement

Advertisement