मुंबईतील विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना झटका दिलाय. न्यायालयाने देशमुख यांचा मनी लाँडरिंगप प्रकरणातील डिफॉल्ट बेलचा अर्ज फेटाळला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. ईडीने अनिल देशमुख हेच सचिन वाझेने डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ मध्ये बार मालकांकडून वसुल केलेल्या खंडणीचे मुख्य लाभार्थी असल्याचा आरोप केलाय.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्जात देशमुख यांनी आपल्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्याचा आणि क्रिमिनल प्रोसिजरनुसार त्याची ६० दिवसांची मर्यादा ओलांडली असल्याचा युक्तीवाद केला होता. यावेळी देशमुखांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबर २०२१ रोजी वाढ करून ती ९ जानेवारी २०२२ पर्यंत केल्याचंही म्हटलं.
ईडीकडून अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध
अनिल देशमुख यांच्या वकिलाने न्यायालयीने कोठडी ६० दिवसांपेक्षा अधिक काळ वाढवण्यात आल्याचा आणि ईडी न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा युक्तीवाद केला. तसेच अद्याप न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेतली नसल्याचाही मुद्दा देशमुखांच्या वकिलाने मांडला.
ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात २९ डिसेंबर २०२१ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय. ईडीने अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध केला. निश्चित वेळेआधी आरोपपत्र दाखल झाल्यास आरोपीला डिफॉल्ट बेल मागता येत नाही, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला.