पंढरपूर : अलिकडे तरूणाईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले दोन तरूण कमरेला पिस्तूल लावून रस्त्यावरून फिरत असल्याचे समोर आले आहे. पंढरपूर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. अजय खाडे आणि गणेश शिंदे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या दोन तरूणांची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवेढा रोडवर अजय खाडे हा तरुण पिस्तूलसह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांना आढळून आले.
दुसऱ्या घटनेत पंढरपूर शहरातील संत पेठ भागात राहणाऱ्या गणेश शिंदे या तरूणाला पिस्तूलसह कॉलेज चौकातून पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाच दिवशी घडलेल्या या घोन्ही घटनांमुळे पंढरपूर शहरात पुन्हा गुंडगिरी डोके वर काढतेय का? असा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेले हे दोन्ही तरूण कोणत्या कारणासाठी पिस्तूल घेऊन फिरत होते, याचा तपास आता पोलीस करीत आहेत. याबरोबरच अशा प्रकारची अजून किती हत्यारे शहरात आली आहेत याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
हातात विनापरवाना पिस्तूल घेऊन व्हिडीओ बनवून ते व्हाट्अपवर स्टेटसला ठेवत हिरोगीरी करणं, फेसबुकवर फोटो व्हिडीओ व्हायरल करणं, अशी प्रकरणे अलिकडे पुढे येत आहेत. त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.