Advertisement

जमिनीच्या वादातून भावानेच केला मोठया भावाचा खून

प्रजापत्र | Saturday, 15/01/2022
बातमी शेअर करा

बीड दि.15 - जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावावर प्राणघातक हल्ला करत गंभीररित्या जखमी केल्याची घटना वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे घडली होती. जखमीवर बीड शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडून एक महिन्यानंतरही आरोपीला वडवणी पोलिसांनी अटक केली नाही असे  म्हणत मयताच्या मुलांनी आज थेट जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून मुख्य गेटवर ठिय्या मांडत, 'आमचा बाप मेला, आम्ही उघड्यावर पडलो, मारेकरी अद्याप मोकाट आहेत, आमच्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे, जोपर्यंत आरोपीला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत टाहो फोडला. 
            प्रकाश कारभारी वडझकर व संभाजी कारभारी वडझकर (रा. कुप्पा ता. वडवणी) या दोन भावामध्ये जमिनीचा वाद आहे. या वादातून 13 12-2021 रोजी प्रकाश याने आपले मोठे बंधू संभाजी कारभारी वडझकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केले. या घटनेनंतर प्रकाश कारभारी वडझकर (वय 45) आकाश प्रकाश वडझकर, वसंत बन्सी सावंत, महादेव बन्सी सावंत या चौघांविरोधात 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
              मात्र वडवणी पोलिसांनी या चौघांना अटक केली नाही. उपचारादरम्यान एक महिन्यानंतर संभाजी कारभारी वडझकर (वय 50) यांचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचा पवित्रा मयताच्या मुलींनी घेतला होता. वडवणी पोलिस जिल्हा रूग्णालयामध्ये आलेले होते.

Advertisement

Advertisement