दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील वणौशी खोतवाडी येथे शुक्रवारी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यास दापोली पोलिसांना अखेर यश आले आहे. चोरीच्या उद्देशाने तीन वृद्ध महिलांची हत्या झाल्याचे पोलीस तपासाता उघड झाले आहे. घरातील 1 लाख 62 हजार 150 रुपयांच्या दागिन्यांसाठी हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्यवती पाटणे (75), पार्वती पाटणे (90) व इंदुबाई पाटणे (85) अशी जळून मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
हत्याकांड कसे उघडकीस आले?
तिघीही वृद्ध महिला शुक्रवारी घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. या महिला एकट्याच घरात राहत होत्या. यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य कामाच्या निमित्ताने शहरात राहतात. पाटणे यांच्या घरासमोरच कुलदैवताचे मंदिर आहे. या मंदिराची चावी या महिलांकडे असते. या मंदिरात विनायक पाटणे नामक ग्रामस्थ दररोज पूजा करतात. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे विनायक पाटणे कुलदैवताची पूजा करण्यासाठी आले असता थंडी असल्यामुळे नियमित सकाळी उन्हात बसणाऱ्या या तिघी वृद्ध महिला त्यांना दिसल्या नाहीत. तसेच त्यांच्या घराचा दरवाजाही बंद दिसला.
दापोली पोलिसांनी कसून तपास करीत हत्येचे गूढ उकलले
विनायक पाटणे यांनी घराचा दरवाजा ठोठावत या महिलांना आवाज दिला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. दारही आतून बंद होते. म्हणून विनायक घराच्या मागच्या बाजूस जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा ढकलेला दिसला. विनायक यांनी दरवाजा खोलून आत पाहिले असता या महिलांचे मृतदेह आढळले. त्यांनी तात्काळा इतर ग्रामस्थांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी दापोली पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. कालपासून पोलिसांनी या हत्याकांडाचा कसून तपास करुन अखेर या हत्येची उकल केली आहे.