Advertisement

खेळादरम्यान उधाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, 80 जण जखमी

प्रजापत्र | Saturday, 15/01/2022
बातमी शेअर करा

Jallikattu 2022: तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू खेळादरम्यान उधाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एका 18 वर्षाचा तरूणाचा मृत्यू झालाय. तर, 80 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. पोंगल सणानिमित्ताने राज्यातील अनेक भागात जल्लीकट्टू स्पर्धेचं आयोजन केलं जातं. जल्लीकट्टू हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील एक पारंपारिक खेळ आहे. जो पोंगल सणाच्या वेळी आयोजित केला जातो, जिथे बैलांची माणसांशी लढाई केली जाते. मात्र, हा खेळ अनेकदा जीवघेणा ठरलाय.

आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुराई येथील अवनियापुरम भागात जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान एका तरुणाला जीव गमवावा लागला, तर किमान 80 जण जखमी झाले आहेत. बालमुरुगन असं मृत तरुणाचं नाव आहे. या स्पर्धेदरम्यान, बैलानं त्याच्या छातीवर छिंग मारली. ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली. बालमुरुगनला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलंय. 

अवनीपुरमचा कार्तिक विजयी
ही एकदिवसीय पारंपारिक क्रीडा स्पर्धा सायंकाळी 5:10 च्या सुमारास संपली. 24 बैलांवर ताबा मिळवत अवनीपुरमचा कार्तिक पहिल्या क्रमांकावर राहिला. या मोसमात स्पर्धेचा विजेता ठरलेल्या कार्तिकला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्याने कारही जिंकलीय. जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान गेल्या वर्षी कार्तिकनं 16 बैलांवर नियंत्रण मिळवलं होतं.

जलीकट्टू स्पर्धेला प्राणीप्रेमी संघटनेचा विरोध
प्राणीप्रेमींच्या संघटनेच्या आवाहनावरून सर्वोच्च न्यायालयानं 2014 मध्ये जलीकट्टू स्पर्धेवर बंदी घातली होती.प्राण्यांची क्रूरता, शेकडो लोक जखमी आणि प्राणहानी यांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याला सर्वत्र स्तरातून विरोध दर्शवण्यात आला. दरम्यान, तामिळनाडूनं परंपरा आणि विश्वासाचा हवाला देत या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. अखेर एका अध्यादेशाद्वारे खेळाची परंपरा पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.

Advertisement

Advertisement