बीड : - जिल्हा परिषद बीड अंतर्गत एकूण १८४ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ देण्यात आलेला आहे या कामी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे, जिल्हा परिषद बीड यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बीड जिल्हा परिषदेतील शिक्षकांना देण्यात येणारे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव तब्बल वर्षभर प्रलंबित होते. सदर प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढून पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकांचा पाठपुरावा चालू होता. याबाबत बजरंग सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी (प्रा) यांच्याशी चर्चा करून पात्र शिक्षकांना विनाविलंब वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत सूचित केले. सदर चर्चेस यश येऊन पहिल्या यादीतील १८४ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आलेला आहे. उर्वरित वरिष्ठ वेतनश्रेणी / चटोपाध्याय व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांना येत्या महिन्या भरात लाभ देण्यात येतील असे सोनवणे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.