Advertisement

सोमवारपासून शाळा सुरू करणार; इंग्रजी शाळांच्या मेस्टा संघटनेचा आक्रमक पवित्रा!

प्रजापत्र | Thursday, 13/01/2022
बातमी शेअर करा

औरंगाबादः महाराष्ट्रात वेगानं फैलावणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आता पुन्हा शाळा बंद केल्याने विद्यार्थी मागे राहतील. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. आम्हालाही विद्यार्थ्यांची काळजी आहे. शाळा पूर्ण निर्जंतूक केल्यानंतरच आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ, पण शाळा सुरु करूच यासाठी आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन ने घेतली आहे.

मेस्टाने घेतली संस्थाचालकांची बैठक
11 आणि 12 जानेवारी रोजी मेस्टा संस्थेने शाळांच्या संस्थाचालकांची बैठक घेतली. संस्थाचालकांशी झालेल्या चर्चेचून कोरोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा 17 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीदेखील शिक्षक संघ,मेस्टा, संस्थाचालक महामंडळ आदी संघटनांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे शाळा सुरु करण्यासाठी निवेदन दिलेले होते. संस्थाचालक, पालक आणि शिक्षकांच्या समन्वयातून 50 टक्के उपस्थितीने शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र मेस्टा संघटनेने एक पाऊल पुढे टाकत, आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, मात्र सोमवारपासून इंग्रजी शाळा सुरु करणारच, अशी भूमिका घेतली आहे.

Advertisement

Advertisement