लातूर : तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म असल्याचं विधान ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी केलं आहे. आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असं ते यावेळी म्हणाले. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात ते यांसदर्भात बोलत होते.
‘हे आपलं भाग्य आहे’
कोरोनाचा प्रकोप जगभरात पाहायला मिळतोय. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं. आता आपण सर्वचजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातही या कोरोनाचा दाखला देण्यात आला. एका भाविकास उद्देशून ते म्हणाले, की कीर्तनात उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हा आपला जन्म नसून पूनर्जन्म आहे.
‘हसत हसत जगा’
पुढे ते म्हणाले, की हॉस्पिटल विकत घेणारे गेले. आता डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालवेल? त्यामुळे हसत हसत जगा, असा उपदेश त्यांनी दिला. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले. यमानं लाच घेतली असती, तर यांनी यमालाही चेक पाठवला असता. पण यमानं लाच घेतली नाही, असं ते यावेळी म्हणाले.
‘पुण्य 2021साली कामाला आलं’
कधीतरी वारकऱ्याची सेवा केली, तुळशीला पाणी घातलं, काळ्या आईची सेवा, कधीतरी कीर्तनकाराच्या पाया पडलो, हे पुण्य आपल्याला 2021साली कामाला आलं. आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवानं काढलाय, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. काही लोक खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत. त्यामुळे आनंदानं, हसत हसत जगा, असा सल्ला त्यांनी दिला.