Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रातीला देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर राहणार बंद

प्रजापत्र | Wednesday, 12/01/2022
बातमी शेअर करा

पुणे :  कोरोनाचा वाढता लक्षात घेता सरकारने काही निर्बंध घातले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मकर संक्रातीला ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मकरसंक्रांती निमित्ताने माऊलींना आणि संत तुकाराम महाराज यांना ओवसा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येत असतात, यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.

देहूत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशातच मकर संक्रातीला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मकर संक्रातीच्या सणाला मोठ्या सख्येने भाविक इथे येत असतात. वाढणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना कोरोनाची लागण झाली तर ते त्यांच्या गावातही कोरोनाचा प्रसार करू शकतात. हा धोका लक्षात घेता, मकरसंक्रातीला दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानने भाविकांना देहूत न येण्याचं आवाहन केले आहे.

मकर संक्रातीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून महिला विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना ओवसा वाहण्यासाठी देहू मध्ये दाखल होतात. मात्र मागील दोन वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळं सर्व देवस्थाने बंद होती. त्यामुळे सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे करता आलेले नाहीत. यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने तसेच मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देवस्थान प्रशासनान हा निर्णय घेतला आहे.

मकरसंक्रांती निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींना ओवसा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत देखील येत असतात. कोरोनाचा, तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव राज्यभर फैलावत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता संभाव्य गर्दी टाळण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनेही माऊलींचे संजीवन समाधी मंदिर गुरुवारपासून शनिवारपर्यंत म्हणजे 13 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीची माहिती संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement