Cold Weather in Maharashtra : उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येतोय. थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात कालच्या तुलनेत आज पारा चांगलाच घसरलाय. वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालेली आहे. तर सकाळी सहा वाजता वेण्णालेकवर एक अंश तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत वेण्णालेकवर तापमान तब्बल चार अंशांनी घसरलं आहे. तापमान शून्य अंशांवर आल्याने महाबळेश्वरात दवबिंदू गोठले होते. त्यामुळे महाबळेश्वरात काश्मीरसारखा आभास होत होता. पर्यटकही गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसले.
नंदुरबारमध्येही पारा घसरला आहे. ग्रामीण भागात थंडीमुळे दवबिंदू गोठल्याचं चित्र आहे. बोचऱ्या थंडीत दुर्गम भागातील पाड्यांवर साधनांची वानवा असल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा जोर पाहायला मिळालाय. रामटेक तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवतोय. सातपुड्याच्या दुर्गम भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. दुर्गम भागात थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला जात आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबारच्या तोरणमाळ येथे पारा सात अंशावर घसरलाय. इथला यशवंत तलाव आणि इतर परिसर ओस पडल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून पाहायला मिळतंय.
राज्यात विदर्भ वगळता अनेक भागात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमानात दोन दिवसांपासून मोठी घट झाली. नांदेड, वाशिम, सोलापूर, महाबळेश्वर येथे किमान तापमान सरासरीखाली आहे. मराठवाड्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.