नाशिकः महावितरणने 12 हजार कोटींची वीजचोरी लपवली आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज प्रश्नाचे तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी नाशिकमध्ये केला आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राठी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महावितरण आपला भ्रष्टाचार, वीजचोरी लपवत असल्याचाही गंभीर आरोप केला. काय म्हणतातय होगाडे, नेमके प्रकरण काय, जाणून घेऊयात.
तक्रार अर्ज दाखल करा…
प्रताप होगाडे म्हणाले की, महावितरणने शेतकऱ्यांच्या माथी दुप्पट बिले मारली आहेत. त्यांनी अतिशय सोयीस्करपणे दरवर्षी होणारी 12 हजार कोटींची वीजचोरी आणि भ्रष्टाचार लपवण्याचा घाट घातला आहे. याकडे सरकारही दुर्लक्ष करत आहे. एकीकडे महावितरण शेतकऱ्यांचा वीज वापर दु्प्पट असल्याचे दाखवते. त्यामुळे शेतकरी आणि राज्य सरकार दोघांचीही लूट सुरू आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी वीजबिले आणि थकबाकी दुरुस्तीसाठी तक्रार अर्ज दाखल करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कृषिपंपाचा वीजवापर फक्त 15 टक्के…
प्रताप होगाडे म्हणाले की, शेतीपंपाचा खरा वीजवापर फक्त 15 टक्के आहे. गळतीचे प्रमाण किमान 30 टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. मात्र, कंपनी याच्या उलट खोटा दावा करत शेतीपंपाचा वीजवापर 31 टक्के आणि वितरण गळती 15 टक्के असल्याचे म्हणते. मात्र, खरी वस्तुस्थिती पुढे येऊ दिली जात नाही. महावितरण माहिती लपवते, असा आरोपही होगाडे यांनी यावेळी केला.
तर 6 हजार कोटी जमा होतील…
होगाडे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आधी प्रथम वीजबिले आणि थकबाकी दुरुस्ती करून घ्यावी. त्यानंतरच सवलत योजनेचा लाभ घ्यावा. सलवत योजनेप्रमाणे खरी बिले निश्चित केली आणि 50 टक्के सवलत दिली तर अंदाजे 6 हजार कोटी रक्कम जमा होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला वीज ग्राहक समितीचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष ऍड . सिद्धार्थ वर्मा, चेंबरचे पदाधिकारी कैलास आहेर, संजय राठी, मुकुंद माळी उपस्थित होते.
महावितरणने 12 हजार कोटींची वीजचोरी लपवली आहे. शेतकऱ्यांच्या माथी दुप्पट बिले मारली आहेत. याकडे सरकारही दुर्लक्ष करत आहे.
-प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना