Advertisement

'अंबाजोगाईतला कारभार अनागोंदी, मला द्या रिव्हॉल्व्हर'

प्रजापत्र | Monday, 10/01/2022
बातमी शेअर करा

बीड-'अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार आहे . कंत्राटदार धमक्या देऊन,कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात ' असे उद्गार आहेत अंबाजोगाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार  कोकणे यांचे.त्यांनी या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे आणि आपल्याला कामकाज करता यावे यासाठी चक्क रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे. कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेल्या या मागणीमुळे खळबळ माजली आहे.
       सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार  कोकणे यांची नियुक्ती झाली आहे. कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. येथे देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी असून धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून आणि मंजूर घेतली जातात असे म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता यावे यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावी अशी मागणीच कार्यकारी अभियंता कोकणे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

समाजाने करावा विचार
कार्यकारी अभियंता हे मोठे पद आहे. या पदावरील व्यक्तीला जिल्ह्यात असुरक्षित वाटत असेल तर परिस्थिती किती बिकट बनली आहे याचे आत्मचिंतन सर्वच समाजाने करणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात बाहेरून यायला अधिकारी तयार नसतात. आजही अनेक पदे रिक्त आहेत. बांधकाम विभाग असेल किंवा महसूल , ग्रामविकास  किंवा आणखी  कोणता विभाग, नियुक्ती झाल्यानंतरही अनेक दिवस अधिकारी रुजूच होत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या अधिकाऱ्यांना असुरक्षित का वाटते याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

 

म्हणे अट्रॉसिटी होण्याची भीती
एकीकडे अंबाजोगाईत अनागोंदी कारभार असल्याचे आणि जीविताला धोका असल्याचे सांगतानाच कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी 'या ठिकाणी आपल्यावर अट्रॉसिटी ' होण्याची भीती असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे नव्यानेच आलेल्या अधिकाऱ्याला असे का वाटावे हाही प्रश्न आहे.

 

Advertisement

Advertisement