Advertisement

आम्ही कसली पिढी घडविणार आहोत ?

प्रजापत्र | Monday, 10/01/2022
बातमी शेअर करा

राज्य शासनाला अजूनही शाळा आणि महाविद्यालये आवश्यक वाटत नाहीत का ? हाच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येत आहे. १८ वर्षावरील युवकांचे लसीकरण यापूर्वी सुरु झाले आहे, आता तर १२ ते १८ या वयोगटाच्या देखील लसीकरण होत आहे. तरीही कोणतेही निर्बंध लावायचे ठरले की अगोदर शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस बंद केले जातात.मागच्या काळात परीक्षांचे कसे वाटोळे किंवा खेळ झाला आहे हे आपण पाहत आहोतच. मग असेच सुरु राहिले तर आम्ही कसली पिढी घडविणार आहोत ?

---
मुळात कोरोनाच्या लाटांवर लाटा येताच राहणार आहेत. पहिल्या लाटेच्यावेळी लसच उपलब्ध नव्हती,त्यामुळे सर्वांनाच धोका होता.विषाणूची ओळख नव्हती, त्याबद्दल कसलीच माहिती नव्हती,म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून जे काही केले जात होते,ते सर्वांनीच स्वीकारले.नंतरच्या काळात लस उपलब्ध झाली,लसीकरण सुरु झाले. आता देशातील ७५ टक्के लोकसंख्येला लसीचा किमान १ डोस मिळाला आहे, जनतेत सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे असे सरकारच सांगते, मात्र असे असताना पुन्हा कोरोना वाढू लागला म्हणून लगेच अमुक बंद, तमुक बंद असे सुरु केले जाते, या मागची तार्किकता काय आहे? त्यातही जरा काही झाले की शाळा, महाविद्यालये बंद करून येणाऱ्या पिढीच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ होत आहे हे देखील कोणाला वाटत नसेल तर ते दुर्दैवी आहे.
राज्य शासनाला अजूनही शाळा आणि महाविद्यालये आवश्यक वाटत नाहीत का? हाच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येत आहे. १८ वर्षावरील युवकांचे लसीकरण यापूर्वी सुरु झाले आहे, आता तर १२ ते १८ या वयोगटाच्या देखील लसीकरण होत आहे. तरीही कोणतेही निर्बंध लावायचे ठरले की अगोदर शाळा, महाविद्यालये , कोचिंग क्लासेस बंद केले जातात . मागच्या काळात परीक्षांचे कसे वाटोळे किंवा खेळ झाला आहे हे आपण पाहत अहोंतच. मग असेच सुरु राहिले तर आम्ही कसली पिढी घडविणार आहोत ?
मागच्या काळात सरकारने ऑनलाईन शिक्षणाचा गाजावाजा केला, मात्र यातून मूठभर लोकांना शिक्षण घेता येते, सामान्यांचे काय ? याचे उत्तर अजूनही कोणी दिलेले नाही. आपली राज्यघटना सर्वांना दर्जा आणि संधीची समानता मिळेल असे आश्वासन देते, मग ऑनलाईनच्या प्रकारात सर्वांना समान संधी कोठे आहे ? ग्रामीण , शहरी, निम शहरी , महानगरी असे कितीतरी स्तर आणि प्रकार यात निर्माण झाले आहेत. एक नवी उतरंड यातून तयार होत आहे , मात्र याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता सरकारला खरेच वाटत आहे का , या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळायला तयार नाही.
उठसूट शाळा , महाविद्यालये बंद करायची , परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या किंवा औपचारिकता पार पडून विद्यार्थी उत्तीर्ण करायचे हा सारा शिक्षण व्यवस्थेशी होत असलेला खेळ आहे. शाळा, किंवा महाविद्यालयात विद्यार्थी गेला तरच कोरोना होतो हे कोणते तर्कट आहे हे देखील समजायला हवे. तोच विद्यार्थी बाजारात जातो, हॉटेलात जातो, समाजात वावरतो  त्यावेळी त्याला धोका नसतो आणि मग शाळेत गेल्यावरच धोका निर्माण होतो असे कसे होईल ? आणि हे असेच सुरु राहिले तर शाळा , महाविद्यालये बंद तरी किती दिवस ठेवायची आहेत. शाळेत कोरोना बाधित निघाले म्हणून शाळा बंद हाच जर न्याय असेल तर आज रोज कितीतरी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत, मग आरोग्य व्यवस्थाच बंद करायची का ? मंत्रालयात कोरोना पोहचला, न्यायालयात पोहचला, कायदेमंडळात पोहचला , आज कोणतेच क्षेत्र असे उरलेले नाही जिथे कोरोनाचा शिरकाव झालेला नाही , मग म्हणून सारेच बंद करायचे ठरवले तर जगणे अवघड होईल. प्रत्येकवेळी 'जान है तो जहान है ' छापाची उत्तरे देऊन वेळ मारून नेता येईलही , पण पुढच्या पिढीच्या भविष्याचा खेळ होतोय त्याचे काय ? यावर उपाय शोधणार का नाही ? कोरोनाच्या २ वर्षांनंतरही बंद करणे हाच उपाय वाटणार असेल तर व्यवस्था म्हणून आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत हे नक्की.
-----------------------------------------

Advertisement

Advertisement