बीड : बीड जिल्ह्यातील मागच्या तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने परिविक्षाधिन कालावधी संपलेल्या उपजिल्हाधिकार्यांना नियुक्त्या दिल्या असून त्यात ओंकार देशमुख यांची बीडच्या जिल्हापुरवठा अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. रेशन कार्ड घोटाळ्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडला जिल्हा पुरवठा अधिकारी देण्याचे आश्वासन दिले होते.
राज्यातील परिविक्षाधिन उपजिल्हाधिकार्यांचा प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर त्यांना आता नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला 5 उपजिल्हाधिकारी मिळाले आहेत. यात ओंकार देशमुख (जिल्हा पुरवठा धिकारी), विश्वास सिरसाट (भुसंपादन अधिकारी जा.प्र.5 अंबाजोगाई), दयानंद जगताप (उपजिल्हाधिकारी सामान्य), प्रियंका पाटील (उपजिल्हाधिकारी रोहयो), प्रमोद कुदळे (उपविभागीय अधिकारी पाटोदा) यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. तर पाटोद्याचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी परभणी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यासोबतच प्रमोद चौघुले हे आणखी एक परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी बीडमध्ये आले आहेत.