उस्मानाबाद - जिल्ह्यात 40 वर्षांपूर्वी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणार्या दत्तात्रय वर्हाडे या सच्चा शिवसैनिकाने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आयुष्यभर बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून जगलेल्या या निष्ठावंत शिवसैनिकाच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेली चहाची टपरी कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद होती. आलेल्या आर्थिक ताणतणावामुळे वर्हाडे यांनी नैराश्यातून आपले जीवन संपवले. शिवसेनेत कित्येक नेते आले, नि गेले. सर्वच जुने-नवे नेते मोठे झाले. परंतु आर्थिक उंचीच्या स्वप्नांमागे न धावता, केवळ बाळासाहेबांवरील निष्ठा जपणार्या स्वाभिमानी शिवसैनिकाला भगव्या झेंड्याखालीच गळफास घेवून आत्महत्या करावी लागली, ही दुर्दैवाची बाब मानली जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात धनुष्यबाण 1989 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा यशवंत पेठे यांच्या उमेदवारीने मतदारांसमोर आला. तोवर धनुष्यबाणाची ओळखसुद्धा नव्हती. त्यापूर्वी सात वर्षे अगोदर 1982 साली काही तरुणांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी प्रभावित होऊन जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा उस्मानाबाद शहरात सुरू केली. ना जिल्हाप्रमुख, ना तालुकाप्रमुख तरी देखील सेनेचा पहिला फलक विजय चौकात झळकला.
दत्तात्रय नारायण वर्हाडे चहाची टपरी चालविणारे हे पहिले शाखाप्रमुख झाले. शाखा सुरू करण्यासाठी खिशातील 25 रुपये वर्हाडे आणि त्याचे सहकारी वल्लभ पवार, डी. एन. कोळी, विलास पाटील, संजय पाटील दुधगावकर, बाळासाहेब शिदे, बबन बागल यांनी त्यावेळी खर्च केले होते. कुठलेही मोठे पद, गुत्तेदारी न करता आपल्या स्वतःच्या चहाच्या टपरीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्हाडे चालवित असत. निवडणूक काळात तर त्यांनी चक्क हॉटेल बंद ठेवून घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी शिवसेनेच्या विजयासाठी व पक्षवाढीसाठी निस्वार्थपणे काम केले.
वर्हाडे यांनी आपल्या चहाच्या टपरीतून पै-पै जमा करून आपल्या चार मुलींचे विवाह लावून दिले. आपल्या दोन मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या व्यवसायिक शिक्षणाच्या खर्चासाठी ते वाढत्या वयातही अधिकवेळ चहाच्या टपरीसाठी देत होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या कडक निर्बंध व नियमांमुळे मागील पावणे दोन वर्षे त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत बंद राहिला. परिणामी कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पैसे नसल्याने ते सतत ताणतणावात होते. टपरीशिवाय त्यांना कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नव्हता. निर्बंधांमध्ये शिथीलता आल्यानंतर ते टपरी पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत होते. इकडून तिकडून पैशाची जमवाजमव करतात, तोवर तिसर्या लाटेच्या भितीमुळे ते आणखीनच मानसिकदृष्ट खचले होते. यातच त्यांनी सोमवारी टोकाचा निर्णय घेत गळफास घेवून आत्महत्या केली. वर्हाडे यांच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली, दोन अविवाहित मुले, असा परिवार आहे.
निष्ठावंत शिवसैनिक दुर्लक्ष!
जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, तीन आमदारांसह अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवकांची संख्या मोठी आहे. शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी निष्ठावंत व निस्वार्थीपणे काम करणार्या कार्यकर्त्यांची मोठी फौज जिल्ह्यात आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेते निवडून येतात. निवडणुकीनंतर या कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात कोणीही सहभागी होत नाही. दत्तात्रय वर्हाडे यांच्यासारखा ज्येष्ठ सच्चा शिवसैनिक अनेकांच्या नजरेतून दुर्लक्षित झाला. शेवटी जिल्ह्यात 40 वर्षांपूर्वी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणारा हा सच्चा शिवसैनिक वयाच्या 65 व्या वर्षी गळफास घेऊन गेला. जातानाही अगोदर झाडावर भगवा झेंडा फडकवला अन् त्याखाली स्वतःचा देह...!