ठाकरे सरकारने नव्या वर्षात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्य सरकार १ जानेवारी २०२२ पासूनच महाराष्ट्रात केवळ इलेक्ट्रिक वाहनांचीच खरेदी करणार आहे. याशिवाय वाहन भाड्याने घेताना देखील ते इलेक्ट्रिकच असणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त पर्यावरणासाठी आणि नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनं खरेदीस प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने पर्यावरणाबाबतची कटीबद्धता आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी १ एप्रिल ऐवजी १ जानेवारी २०२२ पासूनच केवळ इलेक्ट्रिक वाहनं खरेदी किंवा भाड्याने घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
“पर्यावरण मंत्रालय जागतिक हवामान बदलावर उपाययोजना करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पर्यावरण मंत्रालयाच्या जागतिक हवामान बदल धोरणाला पाठिंबा दिला. यासाठी मी त्यांचे आभार मानतो,” असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.