बीड दि.२७ (प्रतिनिधी)-राज्यभर चेचेत असलेल्या आरोग्य विभागाच्या भरती घोटाळ्याचे धागेदोरे बीड जिल्ह्याच्या अनेक भागात असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे बिड तालुक्यातही काही व्यक्तींनी यासाठी कलेक्शन केल्याची चर्चा आहे. इतर जिल्ह्यात महसूल विभागात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने भरतीसाठी अनेकांचे 'फेर' घेतल्याचे बोलले जात असून अशा 'काळ्या ' धंद्यांवर आता 'अंकुश ' ठेवायचा तरी कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोग्य विभागाच्या भरतीतमधील सावळा गोंधळ सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. आरोग्य विभागाचा पेपर फोडण्याच्या प्रकरणात वडझरी (ता. पाटोदा ) येथील संजय सानप या भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून जिल्ह्यात अनेक ठिकाणी भरतीच्या नावाने कलेक्शन झाल्याचे समोर येत आहे.
बीड तालुक्यात देखील काही व्यक्तींनी यासाठी कलेक्शन केल्याची सूत्रांची माहिती आहे. जवळच्या जिल्ह्यात महसूल विभागात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या गावासह इतर काही ठिकाणाहून लाखो रुपयांचे कलेक्शन केल्याची माहिती आहे. आता या साऱ्या प्रकारचा भांडाफोड झाल्याने त्या व्यक्तीने काहींचे पैसे परत केले आहेत, तर काही लोक अजूनही त्याच्या घरी फेऱ्या मारीत असल्याचे लोक सांगतात . त्यामुळे भलत्यांच्याच नावाने भरतीचे 'फेर ' घेण्याच्या या 'काळ्या ' धंद्यांचे धागेदोरे शोधून त्यावर 'अंकुश ' ठेवण्यासाठी या साऱ्या प्रकारच्या उच्चस्तरीय चौकशीची आवश्यकता आहे. बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यात त्या दरम्यान फुटलेला पेपर फिरत होता अशीही माहिती आहे. याप्रकारात अजूनही काही राजकीय आशीर्वाद असणारे लोक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून देखील या साऱ्या प्रकरणाचा तपास झाला तर आणखी काही चेहरे समोर येतील , मात्र त्यासाठी तपास यंत्रणांनी ज्यांचे पैसे घेतले गेले आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन तपासाची चक्रे फिरविण्याची आवश्यकता आहे.