बीड : देशभरात आज सुशासन दिन साजरा होत आहे. बीड जिल्ह्यातही प्रशासन सुशासन दिन साजरा करणार आहे. मात्र आजच्या घडीला जिल्ह्यातील बहुतांश विभागाचा कारभार 'प्रभारीं' वर आहे, अनेक वर्षांपासून अनेक पदे रिक्त आहेत, साधा फेरफार घ्यायचा म्हटले तर तीन-तीन महिने ते होत नाही, मागच्या एक वर्षांपासून नवीन पीआर कार्ड मिळणे अवघड झाले आहे. बहुतांश शासकीय कार्यालयात फाईलींचे ढीग पडले आहेत अशा परिस्थितीत कागदावरील सुशासनाचा सामान्यांना उपयोग काय असा सवाल उपस्थित होत आहे.
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर सध्या २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम होतात, मात्र प्रशासनातून सुशासन हरवले असल्याचे चित्र आहे. आज जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये विशेषतः महसूल आणि ग्रामविकास विभागातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या विभागांमध्ये सामान्यांची कामे रोजच पडत असतात, मात्र जिल्ह्यात या विभागांमध्ये मोठ्याप्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे सामान्यांची कामे अडली आहेत. तलाठ्यांकडील फेरफारापासून ते जमिनीच्या तारखांपर्यंत आणि पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये छोट्याछोट्या गोष्टींपर्यंत महिनोमहिने कामे रखडत आहेत.त्यामुळे सुशासन दिनाचा उपयोग काय असा प्रश्न आहे.
तहसीलच्या पुरवठ्यात मिळेना प्रमाणपत्र
बीडच्या तहसील कार्यालयाची अवस्था तर अधिकच वाईट आहे. याठिकाणी कागदपत्रांवर सही करायला कोणीच तयार नाही. अगदी आरोग्य योजनांसाठी लागणारे प्रमाणपत्र देखील वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे.
अधिकारी का टिकत नाहीत याचाही व्हावा विचार
बीड जिल्ह्यात एक तर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नाहीत, नियुक्त्या झाल्या तर अधिकारी बीडला येणे शक्यतो टाळीत आहेत. आलेले अधिकारी रजेवर जात आहेत. याचाही विचार होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात प्रशासनातला राजकीय हस्तक्षेप मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. अगदी फेरफार किंवा पीटीआरवर नाव देखील आम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचे नाही किंवा योजनांचे आराखडे आम्हाला विचारल्याशिवाय पाठवायचे नाहीत अशा राजकीय नेत्यांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मग जिल्ह्यात काम कसे करायचे असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडत आहे. जिल्हाभर कमीअधिक फरकाने हाच प्रकार घडत आहे. त्यामुळेही अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यात काम करायला उत्सुक नसल्याचे चित्र असून हे जिल्ह्याच्या परंपरेला शोभणारे नाही.