अंबाजोगाई : ग्राम पंचायत सदस्यांना प्रत्येक मासिक बैठकीसाठी दोनशे रुपये एवढे मानधन देण्यात येते. मात्र, मागील चार वर्षापासून मानधनाची ही तुटपुंजी रक्कमही देण्यात आलेली नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांचे थकीत मानधन देण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
शासन निर्णयानुसार एका ग्रामपंचायत सदस्याला पाच वर्षात ६० बैठकासाठी १२ हजार रुपये मानधन मिळणे आवश्यक आहे. केज मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ मधील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुका या नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. हे सदस्य निवडून येऊन चार वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप त्यांना मानधन मिळालेले नाही. केज तालुक्यात ११४ ग्रामपंचायत आहेत. यामध्ये १ हजार ५६ ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर अंबाजोगाई तालुक्यात ९९ ग्रामपंचायत आहेत यात जाळापास ९०० ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर बीड जिल्ह्यात जवळपास १०३० ग्रामपंचायत असून त्यात ९३०० ग्रामपंचायत सदस्य आहेत. यातील बहुतांश ग्रामपंचायत सदस्यांना हे मानधन मिळालेले नाही. त्याच प्रमाणे सरपंच आणि उपसरपंच यांना ७५% मानधन हे शासन देते तर २५% मानधन हे ग्रामपंचायत स्तरावर देणे आवश्यक आहे. परंतु हे मानधन देखील बहुतांश सरपंच आणि उपसरपंच यांना मिळालेले नाही. हे मानधन मिळण्याबाबत मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन देण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. आ. मुंदडा यांनी थकीत मानधनाबाबत पाठपुरावा सुरु केल्याने बहुतांशी ग्राम पंचायत सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.