बीड : जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाला गुरुवारी आणखी एक वळण मिळाले आहे. आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देवस्थान जमीनगैरव्यवहार (land scam ) प्रकरणात दाखल गुन्ह्याचा तपास देखील आता सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये यापूर्वी हा गुन्हा आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिवकर यांच्याकडे देण्यात आला होता.
आष्टी तालुक्यातील देवस्थान जमीन घोटाळा सध्या राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. या प्रकरणाशी बड्या राजकीय नेत्यांचे धागेदोरे असल्याच्या चर्चेने या घोटाळ्यावर अनेकांच्या नजरा आहेत. या प्रकरणात आष्टी तालुक्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केलेल्या तक्रारी आणि आ. बाळासाहेब आजबे यांनी स्वाहा केलेला पाठपुरावा यामुळे या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र त्यात चिंचपूर देवस्थान जमिनीचा गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी धरस्वीकार यांच्याकडे देण्यात आला होता. हा गुन्हा देखील सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे द्यावा अशी मागणी राम खाडे यांनी अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे केल्यानंतर मलिक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे यांना तसे पत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर आता चिंचपूर जमीन घोटाळ्यातील गुन्हा देखील पंकज कुमावत यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक के. मलिकार्जून प्रसन्ना यांनी काढले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येणे अपेक्षित आहे.