Advertisement

जास्तीचा मावेजा लाटण्यासाठी बनावट एनए आदेश

प्रजापत्र | Wednesday, 22/12/2021
बातमी शेअर करा

 

बीड : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या मावेजापोटी अनेकांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. जास्त मावेजा मिळावा यासाठी जिल्ह्यात अनेकांनी आपल्या जमिनीचे एन ए झालेले असल्याचे भासविले असून बनावट एन ए आदेश जोडून मोठ्याप्रमाणावर मावेजा उकळला असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या संदर्भात शासनाकडूनच थेट आयुक्तांनाच कारवाईसाठी पत्रव्यव्हार झाल्यानंतर आता आयुक्तांनी जिल्ह्यातील एन ए आदेशांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सोमवारपासूनच बीडच्या तहसील कार्यालयात एक समिती नेमून एन ए च्या फायलींचा शोध सुरु आहे.

 

 

बीड जिल्ह्यातून गेलेल्या सोलापूर धुळे महामार्गाची मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित करण्यात आल्या. या जमिनीच्या मावेहजचे प्रकरण सुरुवातीपासून वादग्रस्त ठरले आहे. जमिनीचा मावेजा वाढवून देण्यासाठी 'उचापती ' करणारे रॅकेटचा जिल्ह्यात कार्यरत होते अशीही चर्चा त्यावेळी होती, अनेकांनी यासंदर्भात आक्षेप देखील घेतले होते, मात्र याची चौकशी झालेली नव्हती.

 

 

आता जमिनीचा मावेजा जास्त मिळावा यासाठी संपादित जमीन अकृषी ( एन ए ) वापराची असल्याचे भासवून जास्त मावेजा मिळविण्यात आल्याचे आता समोर येत आहे. यासाठी अनेकांनी बोगस एन ए आदेश जोडल्याची माहिती आहे. हा विषय शासनाच्या स्तरावर चिरचिला जात असून यात शासनाकडून थेट विभागीय आयुक्तांनाच विचारणा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सोमवारी दुपारनंतरच या विषयावरून बीडच्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली आहे. आयुक्तांच्या निर्देशानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महिजे घेतलेल्या शेतकऱ्यांनी जे एन ए आदेश जोडले होते, त्याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे बीडच्या तहसील कार्यालयात सोमवारी रात्री उशिरापर्यंत एन ए च्या फायलींचा शोध सुरु होता.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार बीड तहसीलमध्ये अनेक वर्षांपासून वरच्यावर एन ए होण्याचे प्रकार घडत आलेले आहेत. मध्यंतरी वेगवेगळ्या कारणांसाठी एन ए ची पडताळणी सुरु झाल्यानंतर अनेकांच्या अडचणी वाढल्या होत्या. अनेक एन ए आदेशाच्या फाईलच कार्यालयात उपलब्ध नाहीत. बीडमध्ये काम केलेल्या काही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने परस्पर बाहेरच्या बाहेर एन ए चे आदेश तयार करण्यात आल्याचीही चर्चा अनेक वर्षांपासून आहे. आता मावेजा घोटाळ्यामुळे ते पुन्हा समोर आले आहे. यामुळे भूमाफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

Advertisement

Advertisement