पुणे दि.18 डिसेंबर – देशात आणि राज्यात ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण रोज वाढत असल्याचं दिसून येत आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णाची संख्या 109 वर पोहचली आहे. तर, राज्यातील एकूण ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पहिल्यांदाच ग्रामीण भागात ओमायक्रॉन बाधित आढळून आली आहेत.
(Infiltration of omecron in rural areas also; 8 patients found on Friday.)
महाराष्ट्रात ओमायक्रॉनने आता ग्रामीण भागात शिरकाव केला असून, चिंता वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात लातूर, उस्मानाबाद, बुलढाण्यानंतर जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सातही जण 2 आणि 3 डिसेंबरला यूएईमधून (UAE) परतले होते. ओमायक्रॉन बाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशींचे दोन्ही डोस घेतले असताना देखील त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याने हा देखील चिंतेचा विषय आहे.
बाधितांच्या संपर्कातील 15 जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पुणे (Pune) महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
शुक्रवारी आढळलेल्या 8 ओमायक्रॉन बाधित रुग्णापैकी सहा जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर दोन जण रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. काल आढळलेल्या आठही रुग्णाचे लसीकरण (vaccination) झालं आहे. या सर्व रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. काल आढळलेल्या सर्व रुग्णाचे वय 29 ते 45 यादरम्यान आहे.
आठ रुग्णापैकी सात जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर एका रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत. प्राथमिक माहितीनुसार काल आढळलेल्या पुणे येथील चार रुग्णांचा दुबई (Dubai) प्रवास, आणि दोन रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई येथील एका रुग्णांचा अमेरिका (America) प्रवास आणि कल्याण डोंबिवली येथील एका रुग्णांचा नायजेरिया प्रवास आहे.