Advertisement

पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अट

प्रजापत्र | Friday, 17/12/2021
बातमी शेअर करा

पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशिरा त्यांनी अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

 

टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी तुकाराम सुपे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांकडून कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. भरती परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचं उघड झालं होतं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचाही समावेश होता.

 

पोलिसांनी प्रीतिश देशमुखच्या घराची झाडाझडती घेतली असता टीईटीची ओळखपत्रं सापडली होती. तसंच काही अपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरकारभार झाल्याची शंका उपस्थित झाली आणि त्यानुसार तपास सुरु झाला. यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर खळबळ उडाली असून तपासाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पहावं लागेल.

 

म्हाडाच्या परीक्षेवेळी काय घडले?

कंत्राटदार कंपनीच पेपरफुटीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती म्हाडा आणि ‘एमपीएससी’ची तांत्रिक समिती यांना मिळताच शनिवारी म्हाडा पुणे मंडळाने याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. कंपनीचा संचालक प्रीतिश याला भेटण्यासाठी दलाल येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री दहा वाजता विश्रांतवाडी येथून प्रीतिश आणि दोन दलालांना अटक केली. रविवारी औरंगाबादमधून आणखी दोन दलालांना अटक करण्यात आली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये पोलीस चौकशी करीत आहेत.

Advertisement

Advertisement