Advertisement

तलाठ्याच्या बदलीसाठी पालकमंत्र्यांचा आटापिटा , प्रशासन म्हणते बदली नियमात बसतच नाही

प्रजापत्र | Friday, 17/12/2021
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात प्रशासनात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप मोठ्याप्रमाणावर वाढला असून प्रशासनावर नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा असतानाच आता एक तलाठ्याच्या बदलीसाठी स्वतः पालकमंत्री आटापिटा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांच्या पत्रानुसार त्या तलाठ्यांची बदली करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने उपजिल्हाधिकाऱ्यांना कळविले , मात्र शासकीय निकषाप्रमाणे सदर बदली करताच येत नाही , अशी भूमिका उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून त्याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यानाच मार्गदर्शन मागितले आहे.

 

 

बीड जिल्ह्यात मागच्या काही काळात प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप मोठ्याप्रमाणावर वाढत असल्याच्या चर्चा सध्या जोरात असून त्यामुळे प्रशासनातील अधिकारी देखील काम करण्यास उत्सुक नसल्याची परिस्थिती आहे. त्यातच आता अंबाजोगाई येथील तलाठी अशोक मुळे यांच्या बदलीसाठी स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे हेच आग्रही असल्याचे दिसत आहे. मुळे यांच्यासदंभात मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचे सांगत त्यांची बदली करावी असे पत्र धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहे. मात्र तलाठ्यांच्या बदलीसाठी जे निकष आहेत त्यात मुळे यांचे प्रकरण बसत नाही, आणि विनंती बदलीच्या प्रस्तावांचे काय झाले हे माहित नाही अशी भूमिका उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. दुसरीकडे अशोक मुळे यांची आजपर्यंतची कारकीर्द ही निष्कलंक राहिली असल्याचे सामान्यांचे मत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या पत्राचे पालन करायचे का शासकीय निकषांचे असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

Advertisement

Advertisement