बीड-जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता एका वेगळ्या वळणावर पोहचला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.जे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत ते आगारातून प्रवाशांना घेऊन निघाले की दुसऱ्या बस स्थानकावर येऊन पोहचेपर्यंत रस्त्यातच अज्ञातांकडून बसवर दगडफेक करण्यात येते. मागील काही दिवसांपासून अनेक बसेस फोडण्यात आल्या असताना आजही (दि.१३) घोडका राजुरीनजीक धारूर आगाराची एम.एच.२० बी.एल.०८३६ बसवर दगडफेक करण्यात आली.याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली असल्याचे चित्र राज्यभर आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आज (दि.१३) कामावर रुजू होण्यासाठी शेवटची डेडलाईन दिली होती.मात्र राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारची आजची डेडलाईन धुडकावून लावली असून संपावर चालक आणि वाहक मोठ्या प्रमाणावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.बीड जिल्ह्यातून मोजक्या बसेस अद्याप सुरु झाल्या असल्या तरी या बसेसवर दगडफेक करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी एसटी बसेसला जाळ्यांचे आवरण बसवल्यामुळे बसवर दगडफेक झाली तरी चालक,वाहक आणि प्रवाशी सुखरूप राहत आहेत.आज घोडका राजुरीनजीक बसवर दगडफेक झाली यावेळी बसमध्ये १३ प्रवाशी होते.मात्र या सुदैवाने कोणालाही जखम झाली नाही,मात्र बसचे ३० हजारांचे नुकसान झाले.
जिल्ह्यातून धावल्या ५ बसेस
सोमवारी (दि.१३) बीड जिल्ह्यातून केवळ ५ बसेस धावल्या.यामध्ये बीड-माजलगाव,धारूर-बीड,गेवराई-बीड आणि आष्टी-बीड( दोन फेऱ्या) बस धावली असून यावेळी १२९ प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घेतला.