करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा आता नागपूरमध्ये देखील शिरकाव झाला आहे. बुर्किंना फासो (Burkina Faso) या पश्चिम आफ्रिकेतील देशातून आलेल्या प्रवाशाला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे नागपुरात पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे.
हा प्रवासी ४ डिसेंबरला नागपूर विमानतळावर आला होता. यावेळी या प्रवाशाचे नमुने जमा करण्यात आले. या नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात आली. त्यात त्याला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. ओमायक्रॉन संसर्ग झालेल्या या रूग्णावर नागपूरमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे.
राज्यात कुठे किती ओमायक्रॉन विषाणू बाधित रूग्ण?
राज्यातील पहिला ओमायक्रॉन रूग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये ६ आणि पुण्यात १ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यानंतर ६ डिसेंबरला मुंबईत २ जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. पुन्हा १० डिसेंबरला मुंबईत ३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ४ रूग्ण आढळले. आता आज (१२ डिसेंबर) नागपूरमध्ये १ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळला. यासह राज्यात एकूण १८ ओमायक्रॉन रूग्ण झाले आहेत.यातील एक रूग्ण उपचारानंतर बरा झाला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर या रूग्णाला रूग्णालयातून सोडण्यात आलं. त्याला पुढील ७ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.