Advertisement

दुसरा डोस न घेणार्‍यांवर होणार कारवाई

प्रजापत्र | Friday, 10/12/2021
बातमी शेअर करा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाच्या दुसऱ्या डोसवरून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना इशारा दिलाय. “आगामी काळात या काही तालुक्यातील नागरिकांनी करोना विरोधी लसीच्या दुसऱ्या डोसला प्रतिसाद न दिल्यास पुढील बैठकीत यावर कारवाईबाबत कडक आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.

 

 

अजित पवार म्हणाले, “प्रशासनाने करोना लसींच्या डोसबाबत माहिती दिली. पुण्यात पहिला डोस १०० टक्क्यांच्या जवळपास झाला आहे. परंतु दुसऱ्या डोसचं प्रमाण त्यामानाने फार कमी आहे. हे प्रमाण देखील वाढलं पाहिजे. मागील १० दिवसांची सरासरी पाहिली तर ती ६० ते ७० हजारांपर्यंत जाते. १० ते १२ दिवसांमध्ये साधारतः ७ ते ८ लाख लोकांनी डोस घेतलाय. लोक प्रतिसाद देत आहेत, मात्र बारामती, इंदापूर, दौंड अशा ४-५ तालुक्यांमध्ये दुसऱ्या डोसची पुरेशी संख्या पाहायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दोघांनाही जिल्ह्यातील यंत्रणांना कामाला लावण्याचे आदेश दिले आहेत.”

 

“…तर लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांविरोधात कठोर आणि कडक निर्णय घेऊ”
“या ठराविक तालुक्यांमध्ये दुसऱ्या लसीच्या डोसची संख्या वाढावी म्हणून या आठवड्यात प्रशासनाला संधी दिलीय. त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहू. त्या शहरातील, तालुक्यातील लोकांनी सहकार्य केलं नाही, तर पुढील बैठकीत त्याबाबत आम्ही थोडासा कठोर आणि कडक निर्णय घेऊ. कारण तज्ज्ञांनी काहीही करा पण प्रत्येक जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातील जनतेला लसीचे दोन्ही डोस देण्याचा सल्ला दिला आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement