औरंगाबाद विभागातील चित्र
बीड : एकीकडे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी तपासण्यांचा वेग वाढविण्याचे निर्देश राज्य सरकार देत आहे माझे कुटुंब माझी जवाबदारी या नावाखाली जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाची तपासणी करून घावी असे आवाहन केले जात आहे. मात्र औरंगाबाद विभागात कोरोना तपासणी प्रयोगशाळा क्षमतेपेक्षा अर्ध्याच क्षमतेने काम करत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांनी आता एका उपजिल्हाधिकाऱ्याची यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
औरंगाबाद विभागात कोरोना संसर्गाला रोखण्यासा दृष्टीने अधिकाधिक तपासण्या व्हाव्यात आणि कोरोना बाधित लवकर शोधाता यावेत यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी औरंगाबाद विभागात मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद विभागातील सर्व प्रयोगशाळाची मिळून दैनंदिन तपासणी क्षमता ४ हजार ५१४ इतकी आहे. मात्र आज घडीला केवळ २ हजार १७० तपासण्याच रोज होत असल्याचे चित्र आहे. क्षमतेच्या अर्ध्या प्रमाणात या प्रयोग शाळांचे काम सुरु असल्याने प्रशासनाला कोरोना तपासण्याचा वेग वाढविता येत नसल्याचे चित्र आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने चालाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र तसे होत नसल्याने आता औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची यासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात अली आहे.