बीड दि.8 (प्रतिनिधी)ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांना पत्र लिहीले असून 12 डिसेंबर रोजी आपण एक संकल्प करणार आहोत तो साध्य करणार का? असा सवाल विचारला आहे. आता 12 डिसेंबरला पंकजा मुंडे नेमका कोणता संकल्प हाती घेणार आहेत याचीच उत्सूकता सर्वांना लागली आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना एक पत्र लिहीले आहे. 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यासोबतच गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटूंबाला गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशिर्वाद मिळाले हे आशिर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशिर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्याच वेळी 12 डिसेंबरला एक संकल्प घेण्याचा मनोदय पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला असून हा संकल्प साध्य करणार का? असा सवाल कार्यकर्त्यांना विचारला आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमका कोणता संकल्प घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.