बीड दि.८ (प्रतिनिधी)-विलनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप फुकराला असला तरी अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आंदोलनातून माघार घेतली असल्यामुळे जिल्ह्यात बस सेवा टप्पाटप्याने सुरळीत होत असल्याचे चित्र आहे.बुधवारी (दि.८) बीड जिल्ह्यात १९ बसमधून ४४८ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली आहे.
३ नोव्हेंबरपासून बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे बस सेवा ठप्प झाली होती. परिवहन मंत्री यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.तसेच जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता.बीड जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असले तरी अनेक कर्मचारी कामावर परतत असल्यामुळे जिल्हांतर्गत बस सेवा टपट्प्याने सुरु करण्यात येत आहे. बुधवारी (दि.८) बीड-माजलगाव,बीड-परळी,बीड-अंबाजोगाई,परळी-बीड,धारूर-केज (३ फेऱ्या),धारूर-तेलगाव,गेवराई-बीड (५ फेऱ्या),पाटोदा-बीड (चार फेऱ्या),आष्टी-बीड( दोन फेऱ्या) करण्यात आल्या असून ४४८ प्रवाशांना प्रवासाचा लाभ घेतला असल्याचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी म्हटले आहे.