Advertisement

आणखी दोघांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग

प्रजापत्र | Monday, 06/12/2021
बातमी शेअर करा

करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज (६ डिसेंबर) मुंबईत नव्याने २ रूग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या १० वर पोहचली आहे.

 

संसर्ग झालेल्यांमध्ये दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाचा समावेश आहे. तो जोहान्सबर्ग येथून २५ नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाला होता. त्यांचा ओमायक्रॉन संसर्गाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

 

 

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेल्या २९५ पैकी १०९ जणांशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

 

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “विविध देशातून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या २९५ नागरिकांची यादी पालिका शासनाला मिळाली आहे. त्यापैकी ८८ नागरिकांची अँटीजन टेस्टिंग करण्यात आली. यापैकी ३४ लोकांचा अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ४८ प्रवाशांचे अहवाल येणे बाकी आहे. या यादीतील १०९ जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. काही प्रवाशांचे फोन स्विच ऑफ आहेत, तर काही प्रवाशांच्या घराला कुलूप आहे. त्यामुळे पालिका वैद्यकीय कर्मचारी त्यांचा शोध घेत आहे.”

 

 

“परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. यानुसार परदेशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस गृहविलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय. ७ दिवसानंतर करोना चाचणी आणि चाचणीनंतर ७ दिवस क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांबाबत आदेश काढले असून उद्यापासून कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी पोलिसांबरोबर पालिका संयुक्त कारवाई करेन,” अशी माहिती आयुक्त विजय सूर्यवंश यांनी दिली.

Advertisement

Advertisement