देशात कोरोना ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असताना एक दिलासादायक बातमी आहे. देशात कोरोनाविरुद्ध १०० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. यासंदर्भात राज्याच्या एका अधिकृत प्रवक्त्याने शनिवारी दावा केला आहे. राज्यात तब्बल ५३,८६,३९३ पात्र लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या अखेरीस पात्र १०० टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले होते, असेही त्यांनी सांगितले.
रविवारी बिलासपूर येथील ऑल-इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे करोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी लसीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, असं त्यांनी सांगितलं.