लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका 5 वर्षाच्या निरागस मुलाचा शाळेतुन घरी येताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं त्याच्याजवळील एक पेन. मृत्यू कधी आणि कसा येईल याचा आपण कोणाही विचार करु शकत नाही. या मुलाची शाळा त्याच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती होती परंतु तरी देखील शाळेतुन घरी परतताना या मुलासोबत ही घटना घडली. हे प्रकरण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण नर्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरका खेत पालियाखास गावचे आहे. येथे राहणारे राम लाल यादव यांचा 5 वर्षीय मुलगा अनूप हा शाळेत गेला होता. त्याची शाळा ही घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. हा मुलगा सकाळी सात वाजता शाळेत गेला होता. जेव्हा दुपारी अनूप शाळेतून घरी परतत होता, तेव्हा वाटेत त्याला ठेच लागली, ज्यामुळे तो खाली पडला या दरम्यान, त्याच्या खिशात ठेवलेला पेन त्यांच्या छातीत घुसला.
पेन छातीत घुसल्याने अनूपच्या छातीतून रक्तस्त्राव सुरू झाला. तो रडायला लागला. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अनुपला जवळील मासूमला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या मुलगा आता या जगात नाही यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता, ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.