Advertisement

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

प्रजापत्र | Friday, 03/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई:मेस्मा हा कायदा अत्यावश्यक सेवेला लागतो आणि एसटी (MSRTC) ही अत्यावश्यक सेवा आहे. म्हणून एसटीला मेस्मा (MESMA Act) लागणार नाही हे बोलणे योग्य नाही. ज्या पद्धतीने लोकांना, विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे ते पाहता आता मेस्मा लावायचा का याबाबत राज्य सरकार लवकरात लवकर विचार करून निर्णय घेईल, असे स्पष्ट करत परिवहन मंत्री अनिल परब  यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ईशारा दिला आहे. 

 

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायदा लागू करण्यासंदर्भात आपण कायदेतज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. त्यानंतर मेस्माअंतर्गत कारवाई करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे परिवहन मंत्री परब यांनी म्हटले आहे.

 

परिवहन मंत्र्यांनी संप मागे घेण्याचे पुन्हा केले आव्हान
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा संप मागे घेण्याचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. जर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला तर त्यांच्यावर करवाई करण्यात येणार नाही. मात्र, जी आतापर्यंत कारवाई केलेली आहे ती संप मागे घेतला गेला तरी ताबडतोब मागे घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

'कर्मचाऱ्यांना अडवणाऱ्यांवर करणार कारवाई'
आता या एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा कोणी नेता नाही. मात्र काही लोक एसटी कर्मचाऱ्यांना भडकवत आहेत. अशा भडकवणाऱ्या लोकांवरही राज्य सरकार कारवाई करेल, असा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर येण्यापासून जे अडवत आहेत, अशा अडवणाऱ्या लोकांवरही आता राज्य सरकार कारवाई करणार असल्याचेही परब यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement