Advertisement

ओमायक्रॉनवर 'या' कंपनीचं औषध ठरलं प्रभावी, नव्या व्हेरिएंटवर पडणार भारी

प्रजापत्र | Friday, 03/12/2021
बातमी शेअर करा

 लंडन: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिअएंट आढळून आला आणि सगळ्यांचीच चिंता वाढली. या व्हेरिएंटनं भारतातही शिरकाव केला असून कालच कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. त्यातच आफ्रिकेहून आलेले १० जण बेपत्ता असल्यानं काळजी आणखी वाढली आहे. ओमायक्रॉननं चिंता वाढली असताना लंडनहून दिलासादायक बातमी आली आहे.

 

कोविड१-९ विरोधात तयार केलेलं एँटिबॉडी औषध नव्या सुपर व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरत असल्याचा दावा ब्रिटिश कंपनी ग्लॅक्सो स्मिथक्लाईननं केला आहे. प्राथमिक चाचण्यांनंतर कंपनीकडून हा दावा करण्यात आला आहे. ग्लॅक्सो स्मिथक्लाईननं अमेरिकन कंपनी व्हीआयआर बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं सोट्रोविमॅबची निर्मिती केली आहे. 

 

सोट्रोविमॅबमुळे हलक्या, मध्यम आणि अधिक जोखीम असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण ७९ टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा अनुक्रम पाहता सोट्रोविमॅब या व्हेरिएंटविरोधात प्रभावी असेल अशी शक्यता आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या प्राथमिक परिक्षणांच्या मदतीनं कंपनीनं डेटा तयार केला आहे. 

 

सोट्रोविमॅबची निर्मिती जाणूनबुजून एका म्युटेटिंग विषाणूला लक्षात ठेऊन करण्यात आली होती, अशी माहिती व्हाआयआर बायोटेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज स्कॅनगोस यांनी दिली. जीएसके आणि व्हीआयआरनं तयार केलेलं सोट्रोविमॅबचा एक डोस घ्यावा लागतो. कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर ५ दिवसांच्या आत सोट्रोविमॅब देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

Advertisement

Advertisement