बीड : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला असून सध्या प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीला लागले आहे. नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट आलीच तर परिस्थिती काय असेल याचा आढावा घेतला जात आहे. यात बीड जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बाब असून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था देखील संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या लाटेत काही काळ जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता तसेच अनेक ठिकाणी खाटा कमी पडत असल्याचे चित्र होते. मात्र यावेळी तशी परिस्थिती असणार नसल्याचे चित्र आहे. साध्या आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटांची उपलब्धता आजघडीला संभाव्य आवश्यकतेपेक्षा देखील अधिक असल्याची माहिती आहे.
कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आता राज्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयाने गुरुवारी सर्व जिल्ह्यांकडून पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे. तर बीडमध्ये जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आरोग्य आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवस लागोपाठ मॅरेथॉन बैठक घेतल्या आहेत. यात संभाव्य परिस्थिती आणि सुविधांचा आढावा देखील घेण्यात आला.
दुसऱ्या लाटेच्या तुलनेत बीड जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत मोठ्याप्रमाणावर काम झाले आहे. दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात ४ पीएसए प्लॅन्ट सुरु होते , त्यात आता ७ ची भर पडली असून आणखी ५ प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच ऑक्सिजनयुक्त आणि सध्या खाटांची संख्या देखील जिल्ह्यात पुरेशी असल्याचे चित्र आहे. कोणत्याही क्षणी मोठ्या प्रमाणावर खाटा उपलब्ध करून देता येतील असे चित्र आहे.