Advertisement

पराभूतांचे पुनर्वसन

प्रजापत्र | Wednesday, 30/09/2020
बातमी शेअर करा

बीड :राजकारणात पक्ष संघटना आणि संसदीय पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी असतात. सहाजिकच प्रत्येकालाच संसदीय पक्षात म्हणजे विधीमंडळात किंवा संसदेत काम करायचे असते. एखादे मंत्रीपद किंवा महामंडळ मिळवावयाचे असते. पक्षात काम करण्याची, संघटनेला वेळ देण्याची मानसिकता सहसा आजच्या राजकारण्यात पाहायला मिळत नाही. ही परिस्थिती आजच उदभवली आहे असेही नाही. अगदी पंडित नेहरु आणि इंदिरा गांधींच्या काळातही संसदीय राजकारणात डोईजड होऊ पाहणार्‍यांना पक्ष संघटनेत पाठविणारा ‘कामराज प्लॅन’ होताच. त्यामुळे पक्ष संघटनेतील पदे मिळवायला फारसे कोणी इच्छूक असतात असे नाही. ज्यावेळी संसदीय राजकारणात डाळ शिजत नाही किंवा यश मिळत नाही त्यावेळी मात्र पक्ष संघटनेला महत्व द्यावे असे अनेकांना वाटत असते. काँग्रेसमध्ये हे सातत्याने होत आले आहे. अगदी काँग्रेसचे कार्यकारिणीतील मागच्या दोन टप्प्यातील निवडी पाहिल्या की हे सहज लक्षात येऊ शकते. पक्षाची कार्यकारिणी म्हणजे पराभूतांचे पुनर्वसन करण्यासाठीच आहे की काय असे चित्र काँग्रेसच्या बाबतीत निर्माण झाले होते.
आता काँग्रेस सोबत प्रत्येक पातळीवर स्पर्धा करण्याची जणू शपथच खाल्लेल्या भाजपने कार्यकारिणीत पराभूताचें पुनर्वसन करण्याच्या बाबतीतही काँग्रेसला एकटे सोडायचे नाही असे ठरविलेले असावे हेच जे.पी.नड्डांच्या नव्या टीमकडे पाहून लक्षात येत आहे. नड्डांनी बारा उपाध्यक्ष, आठ महासचिव, तेरा सचिव अशी जम्बो टीम जाहीर केली आहे. भाजपमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष हे पद केवळ मिरविण्याचेच राहिलेले आहे. खरी ताकद महासचिवांच्या हातात असते. मात्र अशा पदांवर देखील ज्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्यातील अनेकांनी निवडणुकीतील विजय कधी पाहिलेलाच नाही. तरुण घोष असतील किंवा दुष्यांत गौतम अगदी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डी.पुरंदरेश्‍वरी या सातत्याने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत होत आलेल्या आहेत. काही नावे विजयी उमेदवारांचीही आहेत पण ती आयुष्यात पहिल्यांदाच आणि ती देखील लाटेवर स्वार होऊन विजयी झालेली आहेत. पंकजा मुंडेंसारख्या ताकद असणार्‍या पण निवडणुकीच्या राजकारणात धक्का बसलेल्या नेत्यांना स्थान देताना थोडा वेगळा विचार झाला आहे इतकेच.
पक्षात निष्ठावंतांना स्थान मिळते आणि जो पक्षासाठी मेहनत घेतो त्याला न्याय मिळतो असे भाजपबद्दल सांगितले जायचे. मात्र नव्या टीममध्ये ते सूत्र देखील पाळले गेलेले नाही. ए.पी.अब्दुल्लाकुट्टीसारखा कम्युनिस्ट पक्षाने निलंबित केलेला नेता सुध्दा भाजपच्या कार्यकारिणीत मानाचे पान मिळवू शकतो हा मोठा बदल पक्षाने केला आहे. एकदा कम्युनिस्टांनाच स्विकारायचे म्हटल्यावर मुकूल रॉय, अन्नपूर्णा देवी, डी.के.अरुणा अशा तृणमूल, राजद, जदयु आदी पक्षातून आलेल्या नेत्यांना आपलेसे करायला भाजपला काहीच अडचण वाटण्याचे कारणच नव्हते. नड्डांनी आपली नवी टीम निवडताना तेच केले आहे.
पक्ष संघटनेसाठी खरे तर नव्या दमाची फौज असावी लागते. तरच संघटन बांधणी सोपी होते. परंतु सध्या भाजपला संघटनेच्या गाव पातळीवरील कामापेक्षाही निवडणुकीच्या काळातील रणनितीवरच जास्त विश्‍वास आहे त्यामुळे पराभूतांची फौज घेवून सुध्दा नड्डा भाजपला व्यापक करु शकतील या भाजपच्या आत्मविश्‍वासाला मानावेच लागेल.

 

Advertisement

Advertisement