Advertisement

लस घ्या आणि मिळवा बंपर ऑफर

प्रजापत्र | Thursday, 02/12/2021
बातमी शेअर करा

हिंगोली : जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनचा धोका वाढला आहे , यावर उपाय म्हणून नागरिकांनी कोरोणा लसीकरनाचे दोन्ही डोस घ्यावे व नियमित मास्कचा वापर करावा असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगातील नागरिकांना दिला आहे, मात्र अनेक जिल्ह्यात प्रशासनाने आवाहन करून देखील लसीकरणाचा वेग वाढत नसल्याने हिंगोली नगर परिषदेने नामी शक्कल लढवली आहे आणि पालिकेच्या या उपक्रमानंतर हिंगोलीतील लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या दुतर्फा रांगाच रांगा लागल्या आहेत. सध्या हिंगोली शहरातील कोणत्याही चौकात फेरफटका मारला की हिंगोली नगरपरिषदेने लावलेल्या या पोस्टरचे दर्शन होते, बंपर लसीकरण ड्रॉ असे लिखाण केलेले हे पोस्टर्स आता हिंगोलीकराचे मुख्य आकर्षण बनले आहेत.

 

या पोस्टरचा हिंगोली पालिका व आरोग्य विभागाला कधी नव्हे इतका मोठा फायदा देखील झाला आहे, याचं कारण म्हणजे, मागील काही महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्टा करून देखील कोरोना लसीकरणाचा न वाढलेला वेग या पोस्टर मुळे वाढला आहे हे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल पण हे खरं आहे. हिंगोली पालिकेचे अधिकारी रत्नाकर अडसरे यांच्या अनोख्या संकल्पनेतून, हिंगोली नगरपरिषदेने बंपर लसीकरण ड्रॉ योजना आखली, लसीकरणाचा पहिला किंवा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी या ड्रा मधून, बंपर बक्षिसे देण्याचे पालिकेने जाहीर करत तशी पोस्टर पालिकेच्या वतीने थेट हिंगोलीच्या चौका चौकात लाऊन त्याची जाहिरात करण्यात आली मग काय , महागड्या वस्तू चक्क लसीकरणाचा डोस घेतल्यानंतर मिळत असल्याने नागरिकांनी ही हिंगोली शहरातील विविध लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी केली.

 

एरवी प्रशासनाने विनंती करूनही लस घेण्यासाठी नाक मुरडणारे , युवक, ज्येष्ठ नागरिक व महिला नागरिकही लसीकरण केंद्रावर दुतर्फा रांगा लावू लागले. या लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेण्यासाठी नागरिकांनी लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाने पालिकेच्या वतीने देण्यात येणार्‍या कूपन वर आपली संपूर्ण माहिती भरून द्यावयाची असून, त्यावर लसीचा डोस पहिला किंवा दुसरा आहे हेदेखील नोंद करायचे आहे, यासाठी दोन डबे देखील पालिकेच्यावतीने लसीकरण केंद्रावर ठेवण्यात आले आहेत. अनेकजण कोरोना लसीकरणाचे डोस घेतल्यानंतर, हिंगोली पालिकेच्या वतीने देण्यात आलेले लसीकरण बंपर ड्रॉ कुपन काळजीपूर्वक माहिती भरून डब्यात टाकत होते, त्यानंतर आपल्याला या लकी ड्रा मध्ये नक्कीच काहीतरी वस्तू मिळेल अशी अपेक्षा देखील करत होते.

 

लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हा लकी ड्रॉ येत्या 27 डिसेंबर रोजी उघडण्यात येणार असल्याने त्याची उत्सुकता अनेकांना आता पासूनच लागली आहे, ज्या लसवंताचे नशीब जोरावर आहे अशांना टीव्ही फ्रीज एलईडी मिक्सर अशा घरगुती वापरातील महागड्या वस्तू नक्की मिळतील अशी अपेक्षा हिंगोलीकरांना आहे. हिंगोली पालिकेच्या या भन्नाट कल्पनेने अशक्य होत असलेला लसीकरणाचा वेग शक्य झालाय, आणि सध्या हिंगोली जिल्ह्यातील लसीकरण हे 67 टक्के पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळेच हिंगोली पालिकेवर आता राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

Advertisement

Advertisement