Advertisement

ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस

प्रजापत्र | Thursday, 02/12/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.2 डिसेंबर – कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात काही दिवसांपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही धांदल उडाली आहे. आज पहाटेपासून पुन्हा अनेक भागात पाऊस कोसळत आहे. पुढचे दोन दिवस भारतीय हवामान विभागाने राज्यात अलर्ट जारी केला आहे.

 

 

थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

 

 

या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज कृषी आयुक्तालय आणि कृषी हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या पावसाचा फटका भाज्यांना बसला असून, बहुतांश भाज्यांचे दर वाढलेले आहेत. लांबलेल्या मोसमी पावसामुळे लुप्त झालेली ‘ऑक्टोबर हीट’ची स्थिती आणि नोव्हेंबरमध्ये तीनही ऋतूंची अनुभूती राज्यातील नागरिकांना मिळाल्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात हवामानाचा लहरीपणा नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे.

 

 

थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. बुधवारी अनेक भागांत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. कोकण विभागातील मुंबई , ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. आज पहाटेपासून महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.

 

 

पश्चिम कोकणात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या नोंदींनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे 28.6 मिमी, कुलाबा येथे 27.6 मिमी, डहाणू येथे 11.6 मिमी, ठाणे येथे 27.2 मिमी पाऊस पडला. पुढचे दोन दिवस हिच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Advertisement

Advertisement