Advertisement

बाबरी प्रकरणात आडवाणींसह सर्वांची निर्दोष मुक्तता

प्रजापत्र | Wednesday, 30/09/2020
बातमी शेअर करा

लखनौ : २८ वर्षांपूर्वीच्या बाबरी मस्जिद पडण्याच्या प्रकरणात लखनौच्या सीबीआय न्यायालयाने आज भाजपनेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. हा गुन्हेगारी स्वरूपाचा कट नव्हता असे न्यायालयाने म्हटले आहे. 
६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मस्जिद पडली होती. त्या अगोदर लालकृष्ण आडवाणी यांनी देशभर रथयात्रा काढली होती. या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवरच अयोध्येत कारसेवक जमले होते. अडवाणी, उमा भारती , साध्वी ऋतुंभरा आदींच्या चिथावणीमुळेच सदर मस्जिद पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात २ वेगवेगळे एफआयआर दाखल झाले होते . भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भरती, कल्याणसिंह यांच्यासह ३२ जणांविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला त्यांच्यावर हा आरोप ठेवण्यात आला नव्हता, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर सीबीआयने गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचे दोषारोपात म्हटले होते. याची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात न्या. एस. के . यादव यांच्यासमोर झाली. न्यायालयात सीबीआयने साडेतीनशे साक्षिदार आणि ६०० कागदपत्रे पुरावा म्हणून दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना मुक्त केले आहे. 
दरम्यान निकाल सुनावलं जात असताना लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती , कल्याणसिंह न्यायालयात उपस्थित नव्हते. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाशी जोडले गेले होते. 

 

Advertisement

Advertisement