बीड : राज्यभरात बोगस बायोडिझेलवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. बीड जिल्ह्यात अजूनही ठिकठिकाणी राजकीय आशिर्वादातून बोगस बायोडिझेलची विक्री होत आहे. या पार्श्वभूमीवर बार्शीनाका परिसरातील बोगस बायोडिझेल विकणार्या पंपावर स्थानिक गुन्हा शाखेने छापा मारला आहे. या ठिकाणी लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या बार्शीनाका भागात एका पंपावर बेकायदेशीरपणे बायोडिझेलची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरुन स्थानिक गुन्हा शाखेने पुरवठा विभागाच्या सहकार्याने सदर पंपावर छापा टाकला आज दुपारी झालेल्या या कारवाईत सुमारे साडेतीन हजार लीटर बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे एपीआय कोकलारे, एएसआय खेडकर, कॉन्स्टेबल शेख नसीर, रामदास तांदळे, प्रसाद कदम, अशोक दुबाले, अतुल हराळे तर पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार लता सिरसट, मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी शेख नईम रहीम आणि शेख फय्याज या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात पेठबीड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.