Advertisement

बीड जिल्ह्यातून या जिल्ह्यात जाण्यासाठी असणार असे बंधन

प्रजापत्र | Tuesday, 30/11/2021
बातमी शेअर करा

परभणी दि.30 नोव्हेंबर – परभणी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. यासाठी मंगळवार (दि.30) पासून जिल्हा सरहद्दीवर 8 तर परभणी शहरासाठी 6 तपासणी कक्षांची व्यवस्था केली असून बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर तपासणीसह लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

दक्षिण अफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचे संभाव्य संकट लक्षात घेता महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे.

 

यासाठी मंगळवार (दि.30) पासून जिल्हा सरहद्दीवर 8 तर परभणी शहरासाठी 6 तपासणी कक्षांची व्यवस्था केली असून बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर तपासणीसह लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, मनपा आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा व तातडीने कामाला लागा. टाळेबंदी नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील.

 

विदेशातून, परप्रांतातून तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. व्यापारी, नागरिकांनीही करोना नियमांचे पालन करावे, उल्लंघन केल्यास व्यक्तीस 500 रुपये दंड व संस्था किंवा आस्थापनांना 10 हजारापर्यंत दंड होऊ शकतो, असेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

 

जिल्ह्यात सर्व शासकीय, खासगी परिवहन सेवा पुरविणाऱ्या वाहनधारकांना करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचे पत्र वाहनाच्या दर्शनी भागावर लावावे लागणार आहे. ज्यांनी लस घेतली नाही, अशांना 500 रुपये दंड लावला जाणार आहे. तसेच परिवहन एजन्सीच्या मालकाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लावून परवाना रद्द केला जाणार आहे. यासोबतच दुहेरी मुखपट्टी किंवा एन-95 मुखपट्टी वापरणे, शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

जिल्ह्याच्या सीमेवर आरोग्य पथक राहणार असून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी करण्यासाठी जिल्हा सीमेवर आरोग्य पथकांची नेमणूक केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यात नव्या विषाणूपासून होणारा संभाव्य धोका ओळखून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. 10 देशांमध्ये ओमिक्रोन विषाणू असलेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, हाँगकाँगमधून येणाऱ्या प्रवाशांच्या किंवा इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींकडून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवरच नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. परभणी जिल्ह्यात बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांसह नागरिकांंची येजा असते. यामुळे आता बीडकरांना परभणी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसार चाचणी करावी लागणार आहे.

 

Advertisement

Advertisement