बीड दि.29 (प्रतिनिधी)ः आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियात फिरत आहेत. मात्र राज्य शासनाने कोणतेही कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचे लॉकडाऊनही लागणार नसून केवळ प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्क, शारिरीक अंतर आणि लसीकरण हे नियम पाळावे लागणार आहेत.
सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे जगाचाच ताण वाढला आहे. आफ्रिकेतून आलेले अनेक जण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यामुळे सरकारी पातळीवर देखील गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागणार असल्याच्या चर्चा आणि अफवा सध्या जोरात आहेत. मात्र प्रशासनाने असे कुठलेही कठोर निर्बंध किंवा कुठलेही लॉकडाऊन लावलेले नाही. केवळ गर्दी टाळणे, मास्क वापरणे, दुकानात किंवा सांस्कृतिक ठिकाणी गेल्यानंतर ग्राहकाचे आणि व्यापार्याचे लसीकरण झालेले असणे अशा प्रकारच्या अटी घातलेल्या आहेत. या शिवाय कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन सध्यातरी लागू करण्यात आलेले नाही किंवा शासकीय पातळीवर तसा विचारही सुरू नाही. आजच्या तारखेतही कोरोनाची राज्यातील परिस्थिती अत्यंत नियंत्रणात असून रूग्णसंख्या मर्यादित आहे.