नवी दिल्ली-मागील आठवड्यातील शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर आज सोमवारी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात नफा वसुली जोरात सुरू झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, सेन्सेक्स दिवसाखेर 153 अंकांनी वधारत 57,260 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 27 अंकांनी वधारून 17,053 अंकांवर बंद झाला.
याआधी सकाळी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा किंचीत घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्समध्ये 700 आणि निफ्टीमध्ये 240 अंकापेक्षा अधिक घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. रिलायन्समधील खरेदीमुळे शेअर बाजार काही प्रमाणात सावरला असल्याचे म्हटले जाते. दिवसातील एका सत्रात सेन्सेक्स 519 आणि निफ्टी 134 अंकांनी वधारला होता. म्हणजेच दिवसाच्या निच्चांकी स्तरावरून सेन्सेक्स 1244 अंक आणि निफ्टीत 378 अंकांची तेजी दिसून आली. शेअर बाजारात आज स्मॉल कॅप, मिड कॅपशिवाय, ऑटो, एफएमसीजी, ऊर्जा आदी क्षेत्रात घसरण दिसून आली. तर, आयटी, हेल्थकेअर क्षेत्रातील स्टॉकचे दर वधारले होते.